- कारवाईकडे पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकार्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
- खरेदीखताच्या हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस नोंदी
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
तळवडे या रेड झोन भागांत अनधिकृत तब्बल 45 इमारती बांधून सदनिका व व्यावसायिक गाळ्यांची खुलआम विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे या जमिनीची तसेच, मिळकतींच्या खरेदीखताच्या बोगस नोंदी हवेली दुय्यम निबंधक कार्यालयाकडे विनाअडथळा करण्यात आल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्यांच्या वरदस्तामुळे ही बांधकामे सुसाट गतीने सुरू आहेत. यावर कळस म्हणजे महापालिकेचे उद्यान व खेळांच्या मैदानासाठी आरक्षित असलेली जागा हडप करून परस्पर विकण्यात आली आहे. त्याबाबत पालिका प्रशासनाला काहीच सोयरे सुतक नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
रेड झोनमधील या अनानोंदी व गंभीर प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते हेमंत भोसले यांनी राज्याचे नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तक्रार केली आहे.
हेमंत भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे की, लष्कराने देहूरोड ऑडर्नन्स फॅक्टरीच्या 2 हजार यार्डाचा परिघाचे क्षेत्र रेड झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केले आहे. त्यात महापालिका हद्दीतील तळवडे भाग आहे. त्या भागात कोणतेही बांधकाम करण्यात सक्त मनाई आहे. असे असतानाही व्यावसायिक दीपक जाधव व इतर काही व्यावसायिकांनी तळवडे गट क्रमांक 167 येथे महापालिकेच्या बांधकाम परवानगीचे नियम धाब्यावर बसवून चार ते पाच मजल्याच्या तब्बल 45 इमारती बांधून त्या विकण्याचा सपाटा लावला आहे. एकूण 450 ते 475 सदनिका असून, 25 ते 30 व्यावसायिक गाळे आहेत. तसेच, तेथे मोठे मोठे हॉटेल, शॉपींग मॉल व रूग्णालयाचे बांधकामही करण्यात आले आहे.
महापालिकेच्या नगर रचना व विकास विभागाने 30 मे 2008 रोजी तळवडे भाग ‘ना विकास’ भाग असल्याचे जाहिर केले आहे. महापालिकेने तळवडेतील गट क्रमांक 167, 168 मधील आरक्षण क्रमांक 1/6 नुसार 0.50 आर हे उद्यानासाठी आणि आरक्षण क्रमांक 1/7 नुसार 0.50 आर हे खेळाचे मैदान म्हणून आरक्षित केले आहे.
दरम्यान, एस. आर. गोकुळे व इतर कुलमुखत्यारधारक गोविंद पंजाबीतर्फे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 27 सप्टेंबर 2006 च्या तळवडे गट क्रमांक 167 मधील 86 चौरस मीटर जागेसाठी अकृषिक (एन.ऐ.) परवानगी पत्र रहिवाशी इमारतीच्या बांधकामासाठी मिळविली. ती जागा पुढे पंजाबी यांनी अनेकांना विकली. पंजाबी यांच्यामार्फत नाईकवाडे व दीपक जाधव यांनी कालबाह्य व रद्द झालेल्या अकृषिक परवानगी पत्राच्या आधारे 86 चौरस मीटर जागेव्यक्तिरिक्त गट क्रमांक 167 मधील सर्व जागा प्लॉटींग करून विविध खरेदीदारांना विकली. रेड झोनमधील जमिनीचे खरेदीखत किंवा अन्य विकासास बंदी असताना देखील बोगस खरेदीखत नोंद नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयाकडे सर्रासपणे सुरू आहेत. दस्त नोंदणी तथा तुकडे बंदी कायदा अस्तित्वात असतानाही कसलीही भिड न बाळगता राजरोस पणे ही ऑगस्ट 2022 पर्यंत दस्त नोंदणी सुरूच आहे. तसेच त्या खरेदी-विक्री व्यवहार पिंपरी-चिंचवड महापालिकेने उद्यान व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित केलेली जागा हडप करून परस्पर विकण्यात आली आहे. त्यांची ही बोगस नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत पालिकेचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत, असा आरोप हेमंत भोसले यांनी केला आहे.
दीपक जाधव व इतर व्यावसायिकांनी तब्बल 45 अधिकृत इमारती बांधून ती अनेकांना विकली आहेत. त्यात 450 ते 475 सदनिका आणि 25 ते 30 व्यावसायिक गाळे आहेत. त्या मिळकतींचे बोगस खरेदीखत दस्त नोंद नोंदणी व मुद्रांक विभागाकडे करण्यात आले आहे. या भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरूच आहेत. त्यांच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांची मालमत्ता व आर्थिक फसवणूक होत आहे. पै पै जमविलेली रक्कम या घरांसाठी नागरिकांनी खर्च केली आहे.
ती अनधिकृत बांधकामे एका दिवसात काढून घ्यावीत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाच्या फ क्षेत्रीय कार्यालयाने दिली होती. नोटीस देऊनही अद्याप एक वीट ही हलविण्यात आलेली नाही. उलट, नोटीस मिळाल्यानंतर बांधकामे अधिक वेगात पूर्ण केली जात असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, या अनधिकृत बांधकामांच्या मिळकतीची बेकायदेशीरपणे नोंदी महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे करण्यात आल्या आहेत, असे हेमंत भोसले यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणाची चौकशी करून रेड झोन परिसरातील अनधिकृत बांधकामांवर त्वरीत कारवाई करावी. या बेकायदा व नियमबाह्य बांधकामास प्रोत्साहन व अभय देणार्या महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी कारवाई करावी. तसेच, नोंदणी व मुद्रांक विभागात रेड झोनमधील मिळकतींची बेकायदा व बोगस खरेदीखत दस्त व अदलाबदल दस्त व इतर दस्त नोंद करणार्या भ्रष्ट अधिकार्यांवरही कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी हेमंत भोसले यांनी केली आहे. अन्यथा महापालिका, नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधिकारी संबंधित व्यावसायिकांशी संगनमत करून अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देत आहेत, असे समजून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा हेमंत भोसले यांनी दिला आहे.
नोंदणीचे कागदपत्रे तपासून कारवाई करू
तळवडे रेड झोनमध्ये मिळकतींच्या खरेदीखत दस्ताच्या नोंद झाल्या असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल. कागदपत्रे तपासून घेऊ. तसे काही आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असे नोंदणी व मुद्रांक विभागाचे नोंदणी महानिरिक्षक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
पालिकेची जागा बळकवल्यास फौजदारी कारवाई करू
महापालिकेच्या उद्यान व खेळांचे मैदानाच्या आरक्षित जागा ताब्यात असताना, त्याची परस्पर विक्री झाल्यास फौजदारी कारवाई केली जाईल. रेड झोन भागात अनधिकृत बांधकामे सुरू असल्यास त्यावर कारवाईसंदर्भात फ क्षेत्रीय अधिकार्यांना सूचना देण्यात येतील, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी सांगितले.