पिंपरी| निर्भीडसत्ता न्यूज
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मंगळवारी (३ जानेवारी) निधन झाले. आज (गुरुवार) जगताप कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील घरी आले होते. त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांची जिव्हाळ्याने विचारपूस केली. यावेळी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांचा मोठा संच आणि लोकांच्यामध्ये काम असल्यामुळे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप दोन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्याचे ते म्हणाले. तसेच ते विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष कसे निवडून आले याचाही किस्सा त्यांनी सांगितला.
अजित पवार म्हणाले, आमदार लक्ष्मण जगताप हे विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष लढत होते. त्यावेळी मी त्यांना निवडणुकीवेळी तू फॉर्म भर आणि मी सांगतोय तोपर्यंत फोन बंद ठेव, असे सांगितले. फॉर्म पाठिमागे घेईपर्यंत मी त्यांना फोन बंद ठेवायला लावला. त्यावेळी काँग्रेसला मतदारसंघ सुटला होता. पण मतदारसंघात आमच्या विचारांची मते जास्त होती. त्यामुळे मला आमच्या विचाराचा उमेदवार निवडून यावा, असे वाटत होते. ही निवडणूक एकतर्फी झाली. निवडणुकीत लक्ष्मण जगताप मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.
पुढच्या विधानसभा निवडणुकीतही चिंचवड विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला गेला. पुन्हा लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष म्हणूनच ही निवडणूक जिंकली. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांचा मोठा संच आणि लोकांच्यामध्ये काम असल्यामुळे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले.राजकीय जीवनात माझा आणि पंपरी चिंचवडचा संबंध १९९१ साली आला. तेव्हा मी खासदार होतो. त्यावेळी आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात काम केले. यात लक्ष्मण जगताप होते. त्यांनी वेगवेगळ्या जबाबदारीवर मजबुतीने काम केल्याची आठवण त्यांनी सांगितली.