पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी ते निगडी या रखडलेल्या मेट्रो मार्गाची राज्य सरकारच्या सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली. त्यामुळे मार्गाचे काम लवकरच सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. मात्र, या कामास अद्याप केंद्रांची अंतिम मंजुरी शिल्लक आहे. दुसरीकडे, पाणीपुरवठा योजना सक्षम करणे, पवना व इंद्रायणी नदी सुधार योजना, रिंग रोड, नाशिक फाटा ते चाकण निओ मेट्रो या महत्वपूर्व प्रकल्पाबाबत काहीच घोषणा न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहराला पुन्हा ठेंगा मिळाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची गरज म्हणून दापोडी ते निगडी अशी 12.50 किलोमीटर अंतराची मेट्रो असावी, अशी सुरूवातीपासून शहरवासीयांची आग्रही भूमिका आहे. ती मागणी लक्षात घेऊन महापालिकेने चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाण पुल ते निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प चौक या मार्गाचा डीपीआर महामेट्रोकडून बनवून घेतला. पिंपरी ते निगडी या 4.41 किलोमीटर अंतराच्या विस्तारीत मार्गासाठी 1 हजार 253 कोटीच्या डीपीआर प्रस्तावाला पिंपरी-चिंचवड महापालिकेने 20 डिसेंबर 2018 ला मंजुरी दिली. राज्य शासनाने मंजुरी दिलेला हा प्रस्ताव केंद्र शासनाने 20 ऐवजी 10 टक्केच निधी देणार असल्याचे सांगत माघारी पाठविला.