पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
निगडी येथील रस्ता रूंदीकरणात दुकाने गेलेल्या दुकानदार व व्यापार्यांना पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सेक्टर क्रमांक 24 येथे भूखंड दिला होता. त्या बदल्यात प्रत्येकांकडून रक्कमची घेण्यात आली. मात्र, ती जागा प्राधिकरणाने म्हणजे आताच्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) परस्पर बांधकाम व्यावसायिकांना विकली आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
पुणे-मुंबई या जुन्या महामार्गावरील दापोडी ते निगडी रस्त्याचे महापालिकेने रूंदीकरण केले. सन 2003 मध्ये निगडी परिसरातही मोठ्या प्रमाणात रस्ता रूंदीकरण करण्यात आले. त्यात रस्त्याकडेचे अनेक दुकाने बाधित झाली. त्या दुकानदार व व्यापार्यांना महापालिका व प्राधिकारणाने सेक्टर क्रमांक 24 येथील दुय्यम सुविधा केंद्र, भूखंड क्रमांक 8/9 येथील भूखंड देण्याची ग्वाही दिली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आग्रही होते. त्यासंदर्भात प्राधिकरणाच्या 28 ऑक्टोबर 2005 च्या सभेत तसा ठराव मंजूर करण्यात आला. त्या भूखंडाच्या बदल्यात एकूण 132 व्यापार्यांकडून प्रत्येकी दहा लाखांचा धनादेश 15 फेब्रुवारी 2006 ला घेण्यात आले.
मात्र, तो भूखंड बांधकाम व्यावसायिकाला परस्पर विकण्यात आल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. त्यामुळे व्यापार्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी तक्रार काळभोर यांनी केली आहे.