पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने सर्व महिला कर्मचार्यांसाठी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. तसेच, उल्लेखनीय काम करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेत विद्या यादव यांनी ’घरगुती छळ आणि वारसा संपत्ती हक्क’ या विषयावर महिलांना मागर्दर्शन केले. डॉ. रश्मी घोलप यांनी ’नातेसंबंध आणि जीवनात प्रगती साधणे’, तर डॉ. अश्विनी जोशी यांनी ’जीवनशैली सुधारणे आणि जीवनात तंदुरुस्त आणि निरोगी राहणे’ या विषयावर प्रात्यक्षिकपर माहिती दिली.
पुणे मेट्रोच्या उभारणीत महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. पुणे मेट्रोच्या टनेलिंग आणि भूमिगत स्थानकांच्या उभारणीत शिवानी पवार यांसारख्या महिला अभियंत्या कार्यरत आहेत. पुणे मेट्रोच्या स्थानकांची रचना बनविण्याच्या कामात सुभद्रा मोरे, पंखुडी माथूर व शगुन गुप्ता या महिला अर्किटेक्ट कार्यरत आहेत.
पुणे मेट्रोच्या मानव संसाधन विभागात नीलिमा पाटणे व तृप्ती थेटे या महत्वपूर्ण पदावर आहेत. मेट्रोच्या विधी विभागाची जबाबदारी अग्नेवा घोष यांच्यावर आहे. मेट्रोच्या फायनान्स विभागात मनीषा कोचे व सविता मोहिते या महिला काम करीत आहेत.