- बेशिस्त कर्मचार्यांवर कारवाई करा : अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांचे आदेश
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व विभागातील कर्मचार्यांचे हजेरी पत्रक व फिरते रजिस्टर यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अनेक कर्मचारी कार्यालयामध्ये हजर नसल्याचे दिसून आले. त्यामुळे याला जबाबदार विभागप्रमुख असून त्यांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी. वेळेत न येणार्या कर्मचार्यांबाबत प्रशासन विभागाला कळवावे. तसेच हजेरी पत्रक व फिरते रजिस्टर साक्षांकित करावे. बेशिस्त कर्मचार्यांवर कारवाईचा इशारा अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिला आहे.
बुधवारी झालेल्या पाहणीमध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत अनेक कर्मचारी विभागामध्ये उपस्थित नव्हते. तसेच हजेरी पत्रकावर स्वाक्षरी केलेली नव्हती. फिरती वरून आल्यानंतर अधिकारी व कर्मचार्यांनी परत आल्याची वेळ व स्वाक्षरी केलेली नसल्याचे आढळून आले आहे. तसेच हजेरी पत्रक व फिरते रजिस्टरवर महापालिका मुद्रेची मोहोर उठवलेली नाही. हे महापालिका शिस्तीला धरून नाही. महापालिकेचे नियम तसेच स्वंयशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांची असते. मात्र, याकडे संबंधित विभागप्रमुख दुर्लक्ष करतात.
विभागप्रमुखांनी हजेरी पत्रक व फिरते रजिस्टरची तपासणी करून ते साक्षांकित करावे. 31 मार्चपर्यंत हा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे द्यावा. दोषी कर्मचार्यांवर कारवाई केली जावी, असे अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी आदेश दिले आहेत.