निर्भीडसत्ता न्यूज –
सैनिक जसा सीमेवर उभा राहून देशाचे संरक्षण करतो, तसाच सफाई कर्मचारी देशामधील अस्वच्छता हटवून स्वच्छता निर्माण करत असतो. सफाई कर्मचा-यांच्या या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याविषयी असलेल्या योजनांची अंमलबजावणी व्हायला हवी, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी केले.
सफाई कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते राज्याच्या दौ-यावर आले असून पुणे येथे बैठकीत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे मनपाचेअतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हाथीबेड म्हणाले, देशामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. महात्मा गांधीजींनंतर स्वच्छतेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्त्व दिले आहे. समाजातल्या शेवटच्या माणसाचा विकास व्हावा, प्रगती व्हावी, असे त्यांचे प्रयत्न आहेत. सफाई कर्मचारी हा समाजातील शेवटचा घटक आहे. त्याच्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना आहेत, या योजनांचा लाभ माणुसकीच्या नात्याने त्यांना मिळाला पाहिजे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सर्वोपचार ससून रुग्णालय आदींमध्ये सफाई कर्मचा-यांचे विविध प्रश्न आहेत. सफाई कर्मचा-यांना गणवेश, हातमोजे, गमबूट,मास्क तसेच इतर आवश्यक सुविधा, साधनसामग्री उपलब्ध करुन दिली गेली पाहिजे. सफाई कर्मचा-यांची दर तीन महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी झाली पाहिजे, ठेकेदारांमार्फत निवडण्यात आलेल्या सफाई कर्मचा-यांना नियमानुसार वेतन दिले जाते का, त्यांचा प्रॉव्हीडंट फंड नियमित कपात करुन जमा केला जातो का याबाबतही माहिती घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांसदर्भांत स्वतंत्र समन्वय समित्या स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. या समित्यांमध्ये संबंधित अधिकारी, सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी,महिला यांचा समावेश असेल. दर तीन महिन्यांनी या समित्यांची बैठक होत जाईल. पोलीस विभागात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सफाई कर्मचारी नेमला जावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही त्यांनी केली.
पुणे जिल्ह्याच्या बैठकीनंतर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात जाऊन सफाई कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तीन महिन्यानंतर विभागीय आयुकत स्तरावर आढावा बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.