निर्भीडसत्ता न्यूज –
औद्योगिक वसाहतींचे आरोग्य चांगले रहावे यासाठी, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या माध्यमातून उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश, अतिरिक्त् जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी संबधित यंत्रणेला दिले.
जिल्हा उद्योग मित्र समितीची मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, पिंपरी चिंचवड लघु उद्योग विकास समितीचे अध्यक्ष गोविंद पानसरे, बारामती चेबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दत्ता कुंभार यावेळी उपस्थित होते.
औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा चांगला असावा आणि त्यांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी केले. यासोबतच हिंजवडी औद्योगिक परिसरातील घनकऱ्याची विल्हेवाट, औद्योगिक परिसरात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती, ई.एस.आय.रुग्णालयाची बांधणी, पीएमपीएमल बसेस पार्किंगसाठी औद्योगिक क्षेत्रात जागा उपलब्ध करुन देणे, औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसाठी अंतर्गत रस्त्यावर बस सेवा पुरविणे, चाकण औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते दुरुस्ती, बारामती औद्योगिक क्षेत्रातील इंटरनेट सेवेमध्ये सुधारणा करणे, उद्योगांना अखंडीत विद्युत पुरवठा करणे इत्यादी विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. औद्योगिक विकासासाठी, संबधित यंत्रणांनी ताळमेळ ठेवून काम करावे तसेच यासंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी त्वरित सोडविण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.
बैठकीला महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व विविध औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.