निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी : पुन्हा चिंचवडमध्ये एका चार वर्षाच्या बालिकेवर एका इसमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. भूतांची भीती दाखवून एका चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
याबाबत मुलीच्या पित्याने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या ‘भागुचा काका’ याने चार वर्षीय मुलीला भूताची भीती दाखवून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने नेले. त्यानंतर तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार केले. घरी आल्यावर कुठे होती अशी विचारणा तिच्या पालकांनी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. या घटनेत मुलगी जखमी झाल्याने तिला वायसीएम रुग्णालयात नेले. मात्र लैंगिक अत्याचाराचा प्रकार लक्षात येताच तिला पुढील तपासणी करिता ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडी आणि पिंपरी येथे लहान मुलींवर झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणाची आठवण ताजी असतानाच अशी घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलिसांनी याबाबत उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.