निर्भीडसत्ता न्यूज –
वाघाच्या पोटी वाघिणच जन्माला येईल’ असं म्हणत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे दसरा मेळाव्याला सुरूवात झाली. यावेळी आपल्या भाषणामध्ये पंकजा मुंडेंनी राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका केली.
”लपून वार काय करता, समोरून वार करा असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी केला. तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं. आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करत नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार महामंडळ’ स्थापन करु अशी घोषणाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केली आहे. या मेळाव्यात भगवानबाबांच्या २५ फूट उंचीच्या मूर्तीचे लोकार्पणही पंकजा यांच्या हस्ते झाले. या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती.