निर्भीडसत्ता न्यूज –
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा संसदेत तसेच संसदेबाहेर पर्दाफाश केला आहे. राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत देशाच्या प्रधानसेवकामध्ये नाही. देशभर जनतेला भेडसावणा-या प्रश्नांवरील लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष खोटी माहिती देत आहेत. मात्र, कॉंग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जुमलेबाज सरकारच्या कामाची माहिती गल्ली, मोहल्ला, ब्लॉकस्तरावर जाऊन नागरिकांना द्यावी. पुढील वर्षात होणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सुज्ञ मतदार प्रधानसेवकाला गुजरातला पाठवतील, असा विश्वास अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सचिव आणि महाराष्ट्राच्या सहप्रभारी सोनल पटेल यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहर काँग्रेसच्या वतीने सोमवारी तळवडे (निघोजे, दि. 22 ऑक्टो. 18) येथे सर्व सेलचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसांच्या संवाद कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप पटेल यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आला. यावेळी प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस, शिबिराचे प्रशिक्षक आमदार रामहरी रुपनवर, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश सरचिटणीस डॉ. रत्नाकर महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, पिंपरी चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कविचंद भाट, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, पुणे मनपाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट, माजी नगरसेवक विष्णुपंत नेवाळे, महिला कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस बिंदु तिवारी, सेवादल शहराध्यक्ष मकर यादव आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाल्या की, या प्रशिक्षण शिबिरातून कार्यकर्त्यांना देशासमोर असलेल्या आर्थिक, औद्योगिक, कृषी क्षेत्रातील प्रश्नांची माहिती देण्यात आली. भाजपा सरकारने सर्वसामान्यांना कशा भूलथापा दिल्या. त्यांच्या सर्व योजना असफल ठरल्या याची माहिती नागरिकांना देण्यास कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पुढे यावे.
या शिबिरास आजी-माजी आमदार, विविध सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश बोराटे यांनी तर आभार रमेश बागवे यांनी मानले.