निर्भीडसत्ता न्यूज –
पालिका भवन इमारत, सर्व कार्यालये आणि बाह्य परिसराची यांत्रिक व मनुष्यबळाद्वारे खासगी पद्धतीने स्वच्छता केली जाते. या 2 वर्षे कालावधीच्या कामासाठी 94 लाख 50 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे. या कामास पात्र ठरूनही तयारी न दर्शविणार्या ठेकेदारावर कारवाई केली जाणार आहे.
पालिका भवन इमारत, त्यामधील सर्व कार्यालये आणि बाह्य परिसराची खासगीकरणाद्वारे यांत्रिक पद्धतीने आणि मनुष्यबळाद्वारे दैनंदिन साफसफाई कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यासाठी 6 निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी 4 ठेकेदार पालिकेच्या अटी व शर्तीमध्ये पात्र ठरले आहेत.
या कामासाठी तिरूपती इंडस्ट्रीयल सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीचे दर कमी असल्याने त्यांच्याकडून दर पृथ:करण मागविले होते. मात्र, सदर काम करण्यास ठेकेदाराने नकार दिला आहे. तसे, ठेकेदाराचे पत्र पालिकेस 23 ऑगस्टला मिळाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर पालिका कारवाई करणार आहे.
त्यामुळे तावरे फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 18 सप्टेंबरच्या पत्रानुसार 94 लाख 50 हजार रूपये असे 23.24 टक्के कमी दराने काम करण्यास तयारी दर्शविली आहे. या दरास प्रशासनाने 15 ऑक्टोबरला स्वीकृती दिली आहे. या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि.23) होणार्या स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.