निर्भीडसत्ता न्यूज –
रावेत, किवळे, मामुर्डी, शिंदेवस्ती येथील नागरिकांना थेट प्राधिकरणात येण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाने (एमआयडीसी) आपल्या ताब्यातील सव्वाएकर जागा देण्यास मंजुरी दिली आहे. गेली पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न शिवसेना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांच्या मध्यस्थीने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोडविला आहे.
वाहतुकीस रस्ता नसल्याने या गावांसह अन्य नागरिकांना स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यातून गेली 18 वर्षे ये-जा करावी लागत होती. त्यामुळे भांडणे, न्यायालयीन वाद यापासून आता सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. मुंबई मंत्रालयात बुधवारी (दि.21) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या कार्यालयात या प्रश्नाविषयी अधिवेशन सुरू असतानाही विशेष बैठक घेण्याची विनंती आमदार चाबुकस्वार यांनी त्यांच्याकडे केली होती. यापूर्वी याविषयी 21 जूनला मंत्रालयात बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका व एमआयडीसीने संयुक्त पाहणी करून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ता कसा निर्माण होईल, याविषयी अहवाल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
आजच्या बैठकीत दोन्ही संस्थांनी आपले अहवाल उद्योगमंत्र्यांना सादर केले. सदर बैठकीस आ. चाबुकस्वार, उद्योग मंत्रालयाचे उपसचिव डॉ. ना. को. भोसले, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. एस. मलाबादे, प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख, पिंपरी-चिंचवड पालिकेचे कार्यकारी अभियंता दि. शं. सुपेकर, उपअभियंता एस. एन. मुठाळ आदी उपस्थित होते.
रावेत येथील सर्व्हे क्रमांक 155 येथे 98 फ्लॅटची स्वप्नपूर्ती सोसायटी आहे. या सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यातूनच शेजारील नर्मदा सोसायटीचे नागरिक तसेच, रावेत, किवळे, शिंदेवस्ती, आदर्शनगर, विकासनगर, मामुर्डी, शुभम पार्क, निसर्ग दर्शन, परमार कॉम्प्लेक्स येथील रहिवाशी ये-जा करतात. त्यामुळे स्वप्नपूर्ती सोसायटी विरूद्ध इतर असा लढा सुरू होता.
अखेर याविषयी तोडगा काढण्यासाठी स्वप्नपूर्तीच्या सिमाभिंतीच्या मागे असलेली एमआयडीसी जागा रस्त्यासाठी दिल्यास नागरिकांच्या वाहतूकीचा प्रश्न सुटेल असा प्रस्ताव आ. चाबुकस्वार यांनी मंत्र्यासमोर मांडला. पालिका अधिकार्यांनीही त्यास मान्यता देत एमआयडीसी जागा दिल्यास निधी अदा करण्यास तयार असल्याचे म्हटले. जवळपास 350 मीटर म्हणजेच सव्वाएकर जागा नागरी हित लक्षात घेऊन एमआयडीसीने देण्याचे कबुल केले आहे. या निर्णयामुळे पालिकेपुढे असलेला रस्त्याचा प्रश्न सुटल्याने नागरिकांच्या त्रासातून सुटका झाली आहे. स्वप्नपूर्ती सोसायटीला आपली अंतर्गत जागा सार्वजनिक नाही याचे समाधान मिळाले आहे. या निर्णयाची माहिती समजताच नर्मदा व स्वप्नपूर्ती सोसायटीतील सदनिकाधारकांनी फटाके वाजवून याचे स्वागत केले.