निर्भीडसत्ता न्यूज –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि. 24 नोव्हेंबर) मारुंजी येथे अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. लाडशाखीय वाणी समाज महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती संस्थेने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. 110 एकर विस्तीर्ण परिसरात भव्य तीन मंडप उभारण्यात आले आहेत. त्या शेजारी उद्योजकता मार्गदर्शन प्रदर्शनाच्या 200 स्टॉलचे स्वतंत्र मंडप, उपस्थित राहणा-या 50 हजार समाज बांधवांसाठी आसन व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र भोजन कक्ष, अत्यावश्यक सेवेसाठी सुसज्ज रुग्णवाहिका, दोन वैद्यकीय पथके, सहा अग्निशमनदलाचे बंब व तुकडी, पोलिसांना सुरक्षेसाठी सहकार्य करणारे 110 स्वयंसेवक व बाऊंसर, 30 एकर जागेत पार्किंग व्यवस्था, मुख्यमंत्री व इतर अति महत्त्वाच्या व्यक्तिंसाठी हेलिपॅडची उभारणी करण्यात आली आहे. मुख्य मंडपात 200 फुट लांबीचे भव्य व्यासपीठ, उपस्थितांना कार्यक्रमा पाहण्यासाठी 24 एलईडी वॉल लावण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन कॅमे-याव्दारे सर्व अधिवेशनाचे चित्रिकरण करण्यात येणार आहे.
उद्घाटनाच्या कार्यक्रमास सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीष बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
महाअधिवेशनाचा समारोप रविवारी (दि. 25 नोव्हेंबर) दुपारी 4:30 वाजता माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने होईल. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, राजू शेट्टी, श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार मेधा कुलकर्णी, लक्ष्मण जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.