निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचा-यांसह कंत्राटी कर्मचा-यांना ‘स्मार्ट वॅाच’ थेट पद्धतीने खरेदी करण्याची प्रशासनाला इतकी घाई का झाली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती देण्याचा मुद्दा उपस्थित करीत सत्ताधार्यांसह विरोधी सदस्यांनी या खरेदीस विरोध दर्शविला. त्यामुळे 4 हजार 544 सफाई कामगारांना वॉच खरेदीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंगळवारी (दि.11) तहकूब ठेवला.
सभेच्या अध्यक्षस्थानी समिती अध्यक्षा ममता गायकवाड होत्या. किती महापालिकांनी सफाई कामगारांसाठी स्मार्ट वॉचची योजना राबविली आहे, असा मुद्दा भाजपचे सदस्य विलास मडिगेरी यांनी उपस्थित केला. नागपूर, इंदौर, लखनौ, मुंबई, ठाणे, दिल्ली आदी महापालिकेत सफाई कामगारांसाठी स्मार्ट वॉच वापरले जात असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला. मात्र, ती योजना यशस्वी झाली का, असा सवाल करीत सविस्तर माहिती देण्याची मागणी मडिगेरी यांनी केली. त्यावर अधिकार्यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य राजू मिसाळ यांनी निविदा प्रक्रिया न राबविता थेट पद्धतीने स्मार्ट वॉच खरेदीला दर्शविला. ही खरेदी नागपूर पालिकेमार्फत पिंपरी-चिंचवड पालिकेवर लादली जात आहे. आतापर्यंत ही योजना कोणत्याच पालिकेत यशस्वी झालेली नाही,असे ते म्हणाले.
भाजपचे सांगर आंगोळकर म्हणाले की, कंत्राटी सफाई कामगार व घंटागाडी कामगारांना संबंधित ठेकेदारांनी ते वॉच उपलब्ध करून द्यावेत. तशी अट निविदा प्रक्रियेत का घालण्यात आली नाही. पालिकेने ठेकेदारांच्या कामगारांना वॉच पुरवू नयेत.
एका वॉचसाठी दरमहा 287 रूपयांप्रमाणे एकूण दरमहा खर्च 12 लाख 4 हजार 128 आहे. एका वर्षासाठी हा खर्च 1 कोटी 56 लाख 49 हजार 536 आहे. चार वर्षांसाठी एकूण एकूण 6 कोटी 25 लाख 98 हजार 144 इतका खर्च आहे. त्यावर जीएसटीचा अतिरिक्त खर्च आहे.