निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील विविध प्रकल्पांचा आराखडा-निविदा तयार करण्याचे तांत्रिक कौशल्याचे काम तज्ज्ञ सल्लागारांकडून करून घ्यायचे आणि काटेकोरपणे तपासून प्रकल्प मार्गी लावायचे, असे अपेक्षित असताना महापालिकेचे सल्लागार संबंधित प्रकल्पाचा खर्च फुगवून नागरिकांच्या कररुपी पैशांची लूट करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी केला आहे.
यासंदर्भात नगरसेवक काटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, “स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव परिसरातील कोणकोणत्या विकासकामांची तपासणी केपीएमजी या सल्लागाराने केली, त्याचा अहवाल प्रशासनाने सादर करावा.
पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन लावण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम करून पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आवश्यक असताना ते पाणी नद्या नाल्यांमध्ये सोडले जात आहे. त्यामुळे नैसर्गि पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात सल्लागार केपीएमजी यांनी चुकीचा सल्ला महापालिकेला दिला आहे. पिंपळेसौदागर परिसरात आवश्यकता नसतानाही रस्त्याच्या मधोमध मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन टाकून केवळ निवेदेतील रक्कम वाढवून त्यामाध्यमातून तब्बल ६० कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च महापालिकेच्या माथी मारण्याचे काम सल्लागार करत आहेत. त्यामुळे स्ट्रॉम वॉटर लाईन कामाच्या निवेदेची रक्कम कमी करून रचनेत बदल करण्याचे आदेश शहर अभियंता, प्रकल्प अभियंता आणि सल्लागार यांना देण्यात यावेत. केपीएमजी या सल्लागाराने शहरात जेएनएनयुआरएम अंतर्गत टाकलेल्या स्ट्रॉम वॉटर लाईनची तपासणी केली आहे का?, याचा अहवाल प्रशासनाने द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.”