निर्भीडसत्ता न्यूज –
बोपखेल, दापोडी, पिंपरी कॅम्प, येथील विकास आराखडयातील प्रलंबित कामे, झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन तसेच अतिक्रमण कारवाई करण्यामध्ये प्रशासनाचा होत असलेला ढिलेपणा आदी अशा तब्बल २२ प्रश्नांवर आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज पालिका आयुक्तांबरोबर मॅरेथॉन बैठक घेतली. प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी प्रशासनाकडून निर्धारित कालावधी वदवून घेत प्रशासनाने गतिमानता दाखवावी अशी सुचना यावेळी केली.
पालिकेच्या आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. पिंपरी विधानसभा मतदार संघातील प्रलंबित कामांसंदर्भात प्रशासनाकडून यावेळी चर्चा व आश्वासन नको तर किती दिवसात प्रत्येक काम मार्गी लागेल याचा कालावधी आमदारांनी वदवून घेतला. सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यासह नगररचना, झोपडपट्टी पुनर्वसन, अतिक्रमण, स्थापत्य आदी विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पिंपरी भाजी मंडईच्या विकासाचा रखडलेला प्रश्न तसेच पिंपरी स्मशानभूमी ते सुभाषनगर डीपी रस्ता तयार करणे या प्रश्नी अनुक्रमे रस्ता व आरक्षणात बदल करणे, सुधारीत विकास योजनेमध्ये १८.०० मीटर रूंद रस्त्याची आखणी प्रारूप आराखडयात करणे, असा तोडगा काढण्यात येऊन चर्चा झाली. रमाबाईनगर येथील इमारतींमधील लाभार्थ्यांना घर देण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत येत्या २५ जुलै रोजी उच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अजंठानगर येथील उर्वरित झोपडीधारकांचे पुनर्वसन, संत तुकाराम नगर येथील डॉ. आंबेडकर क्रिडा संकुलाचे इनडोअर स्टेडियममध्ये रूपांतर करणेसाठी खेळाचे मैदान असा असलेला प्रस्ताव बदलून क्रिडा संकुल असा बदल कागदपत्रांवर घेणे, दापोडीतील रस्त्यावरील भाजी मंडई, रखडलेले क्रिडांगण मैदान, पीएमपीएमएल डेपोचे आरक्षण विकसित करणे आदी प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यात आला.
बोपखेल येथील गणेशनगर भागात विकास आराखडयानुसार जागा संपादन करणे, स्मशानभूमीची दुरावस्था, घाटाची रूंदी वाढवून गाळ काढणे यावर चर्चा झाली. तसेच एच. ए. कंपनीची ६६ एकर जागा पालिकेने घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित करण्याचे निश्चित होऊन शहराच्या सौंदर्य व प्रगतीसाठी ही जागा विविध कामांसाठी महापालिकेकडे असणे आवश्यक असल्याचे आमदारांनी नमूद केले.