निर्भीड न्यूज –
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दोन्ही पालखी सोहळ्यातील दिंडी प्रमुखांचे स्वागत विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती देवून करण्यात येणार आहे.
महापौर शकुंतला धराडे, पदाधिकारी व नरसेवकांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे व दिंडी प्रमुखांचे स्वागत केले जाणार आहे. श्री. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी निगडी येथील भक्ती-शक्ती या ठिकाणी तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळल्याच्या स्वागतासाठी आळंदी फाटा भोसरी येथे स्वागतकक्ष उभारण्यात आले आहे. खराळवाडी, दापोडी येथील विसाव्यांच्या ठिकाणी स्वागतकमान, बॅनर व दर्शनासाठी बॅरिकेट्स उभारण्यात येणार आहेत. आकुर्डी मुक्कामासाठी महापालिकेच्या व खाजगी शाळा ताब्यात घेण्यात आलेल्या असून तेथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच श्री संत तुकाराम महाराज पालखीचे देहू येथील प्रस्थानापासून ते वाखरीपर्यंत अग्निशामक वाहनाची व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सूविधा २४ तास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पालखी सोहळा स्वागतकक्ष, मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी सी.सी.टि.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. साफसफाई, जंतुनाशक फवारणी, फिरते शौचालय इत्यादी नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.