पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पवना बंद जलवाहिनी प्रकल्प 12 वर्षांपासून ठप्प आहे. त्या प्रकल्पावर मी बोलणार नाही. तो भावनिक मुद्दा आहे, असे सांगत खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी महत्वाचा असलेल्या पाणी प्रश्नाला अक्षरश: बगल दिली. कासारवाडी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परिषदेला आमदार उमा खापरे, आमदार अण्णा बनसोडे, माजी खासदार अमर साबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप, आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे व पदाधिकारी उपस्थित होते.
श्रीरंग बारणे यांनी पाच वर्षात मावळ लोकसभा मतदार संघात केलेल्या कामांची माहिती दिली. ते म्हणाले की, महापालिकेने शिवणे बंधार्यातून पाणी उचलावे. मुळशी धरणातील पाण्यासाठी प्रयत्न करावेत.
कोण संजोग वाघेरे, मी ओळखत नाही !
माझ्या समोर कोण आहे हे मला माहिती नाही. त्यांना मी ओळखत नाही, असे सांगत ही निवडणूक नातेगोत्याची नसून देशाची आहे. तुमच्या समोर प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे यांचे आव्हान आहे का, या प्रश्नावर ते बोलत होते. नंतर स्वत:ला सावरत म्हणाले की, अद्याप कोणी उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी कोण आहे, हे माहिती नाही.
वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून नाही तर, देशातून गेली
तळेगाव एमआयडीसी येथे वेदांता फॉक्सकॉन कंपनी येणार होती. मात्र, ती गुजरातला नेण्यात आल्याने स्थानिकांच्या नोकर्या गेल्या, या प्रश्नावर बारणे म्हणाले की, ती कंपनी गुजरातला नाही तर, देशातूनच गेली आहे. तसा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतला आहे.
नातेगोत्याची नाही तर, देशाची निवडणूक
प्रतिस्पर्धी उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मतदार संघातील सर्व नातेगोते माझ्यासोबत असल्याचा दावा केल्या आहे. त्याबाबत विचारले असता बारणे म्हणाले की, माझेही संपूर्ण मतदार संघात प्रचंड प्रमाणात नातेगोते आहे. ते माझ्यासोबत आहेत. ही निवडणूक स्थानिक नसून, देशाची आहे, असे सांगत त्यांनी नातेगोत्याच्या राजकारण या निवडणुकीत क्षुल्लक असल्याचे स्पष्ट केले.
कार्यपुस्तिकेत महापुरूषांचे फोटोच नाहीत
कार्यपुस्तिकेत महापुरूषांचे छायाचित्र नाहीत. त्याबाबत प्रश्न विचारले असता, खासदार श्रीरंग बारणे यांनी सावरासावर केली. मी केलेल्या कामांची छायाचित्रे कार्यपुस्तिकेत आहेत. महापुरूष व नेत्यांचे छायाचित्रे नाहीत. नव्याने छापण्यात येणार्या पुस्तिकेत सर्व महापुरूष व नेतेमंडळींचे छायाचित्र घेऊ, असे सांगत त्या प्रश्नाला बगल दिली.
अजित पवार, पार्थ पवारही माझा प्रचार करणार
महायुतीत अजित पवार तसेच, पार्थ पवार आहेत. त्यांनी माझा प्रचार करावा म्हणून विनंती करणार आहे. ते माझ्या प्रचारात सहभागी होतील. तसेच, मनसेही प्रचारात सामील होणार आहे, असे खासदार बारणे म्हणाले.