निर्भीडसत्ता न्यूज –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी फन रेसिडेंन्सी या हॉटेलमध्ये भोसरीतील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, भाजपचे प्रभारी बाबू नायर, सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके आदी उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत ‘महायुती’चे अधिकृत उमेदवार म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांचे काम आम्ही भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये प्रामाणिकपणे केले. त्यामुळे तब्बल ३८ हजार मतांचे ‘लीड’ आम्ही या मतदार संघातून देवू शकलो. मात्र, या निवडणुकीत आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. यांची खंत आजही मनात आहे. यापुढे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करणार आहे. त्यांचा अनुभवाचा फायदा मला होणार आहे. त्यांच्या सहकार्यानेच आम्ही भोसरीचा ‘गड’ जिंकणार आहे.
तसेच, कामगार नेते आणि शिवसेना सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद हे माझ्या लहान भावासारखे आहेत. त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारीसाठी चांगली तयारी केली होती. सकारात्मक वातावरण निर्मिती झाली होती. मात्र, ‘महायुती’च्या जागावाटप सूत्रानुसार हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला आला आणि मला संधी मिळाली. पण, इरफानभाई आज माझ्यासोबत आहेत. त्यांच्या साथीने भोसरीचा विजय सोपा होणार आहे, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये दोन टर्म प्रतिनिधीत्व केले आहे. शिवसेनेच्या गटनेत्या म्हणून त्यांना कामाचा अनुभव आहे. तसेच, त्यांनी भोसरी विधानसभा निवडणूक दोनदा लढवली आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा मला होणार आहे. त्यांच्या सहकार्याने आम्ही भोसरीत पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवणार आहोत, असेही आमदार लांडगे यावेळी म्हणाले.
भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांचा मतदार संघामध्ये चांगला जनसंपर्क आहे. एक चांगला मित्र म्हणून आल्हाट कायम माझ्यासोबत आहे. आमचे पक्ष जरी वेगळे असले, तरी आम्ही आमच्या मैत्रीवर परिणाम होवू दिला नाही. स्वत: विधानसभेकरीता शिवसेनेकडून इच्छुक असतानाही महायुतीचा उमेदवार म्हणून पक्षादेश शिरसावंध्य मानून आल्हाट प्रचारात सक्रीय झाले आहेत. आता माझी ताकद वाढली असून, आम्ही सर्वजण पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणणार आहोत, असेही आमदार लांडगे यांनी यावेळी म्हटले आहे.