निर्भीडसत्ता न्यूज –
- आ. लक्ष्मण जगताप यांना बिनविरोधासाठी अनुकूल स्थिती?
- राष्ट्रवादी शिवसेनेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पुरस्कृत करणार?
- की राहुल कलाटे पक्षाच्या दबावाखाली माघार घेणार?
चिंचवड विधानसभा मतदारसंघातुन अर्ज दाखल केलेले महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. नामनिर्देशन पत्र लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील नियम ३३ नुसार हा अर्ज बाद करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने अधिकृत एबी फॉर्म दिला नसल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी चिंचवड मतदारसंघात शुक्रवारी (दि. ४) रोजी अंतिम मुदतीत १९ उमेदवारांनी २८ अर्ज दाखल केले होते. या अर्जाची आज (शनिवारी) छाननी झाली. त्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी दाखल केलेला अर्ज बाद झाला. तसेच शंकर पाडुरंग जगताप, विजय निवृत्ती वाघमारे, राजकुमार घनश्याम परदेशी, प्रकाश भाऊराव घोडके या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले आहेत.
प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाल्याने आता राष्ट्रवादी राहुल कलाटे यांना राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार करणार की, महायुतीच्या दबावाखाली अपक्ष उमेदवार राहुल कलाटे माघार घेणार. दरम्यान या स्थितीमुळे आमदार लक्ष्मण जगताप यांना बिनविरोध निवडीसाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.