निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली नाही. त्यामुळे या दोन्ही पदासाठी शनिवारी (दि. २२) निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार माई ढोरे यांना ८१, तर राष्ट्रवादीच्या उमेदवार माई काटे यांना ४१ मते मिळाली. त्यामुळे भाजपच्या माई ढोरे यांचा ४० मतांनी विजय झाला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ९ पैकी ६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान केले. अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप आणि शिवसेनेचे प्रमोद कुटे, निलेश बारणे व अश्विनी चिंचवडे हे तीन नगरसेवक गैरहजर राहिले. मनसेचा एक नगरसेवक असून, त्यांनी तटस्थ राहणे पसंत केले.
चालू पंचवार्षिकमधील महापौर आणि उपमहापौरपदाची पहिली अडीच वर्षे संपली. त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठी महापौर आणि उपमहापौरपदासाठी शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. तत्पूर्वी तीन दिवसांपूर्वी या दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले होते. सत्ताधारी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे यांनी महापौरपदासाठी, तर नगरसेवक तुषार हिंगे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरले होते. ढोरे यांच्या अर्जाला भाजपचे हर्षल ढोरे आणि राजेंद्र लांडगे हे सूचक आणि अनुमोदक होते. ढोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेविका माई काटे यांनी, तर उपमहापौरपदासाठी राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते.
महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी शनिवारी सकाळी अकरा वाजता विशेष सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतून गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेत महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. सुरूवातीला महापौर निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर अर्ज माघारीसाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली. या मुदतीत राष्ट्रवादीने अर्ज माघार न घेतल्याने महापौरपदासाठी मतदान घेण्यात आले. भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार माई ढोरे यांना भाजपच्या ७७ आणि अपक्ष ४ अशा एकूण ८१ नगरसेवकांनी मतदान केले. राष्ट्रवादीच्या उमेदवार माई काटे यांना राष्ट्रवादीच्या ३६ आणि शिवसेनेच्या ६ अशा ४१ नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे भाजपच्या माई ढोरे ४० मतांनी विजयी झाल्या आणि त्यांची महापौरपदी निवड झाली. या निवडणुकीत शिवसेनेच्या ९ पैकी ६ नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. भाजपला पाठिंबा दिलेले नगरसेवक नवनाथ जगताप हे गैरहजर राहिले. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नगरसेवक निलेश बारणे, प्रमोद कुटे आणि अश्विनी चिंचवडे हे तीन नगरसेवकही गैरहजर राहिले. तसेच महापालिकेत मनसेचा एक नगरसेवक आहे. मनसेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादीने उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे भाजपचे तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.