निर्भीडसत्ता न्यूज । पिंपरी
अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल सीबीआयच्या हाती लागले आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढले आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढले. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात २०१३ रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.
हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का? याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने २०१९ रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचे सांगितले होते. “अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडले आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती सीबाआयच्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणाऱ्या दुबईस्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती. पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी तज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी ९५ लाखांचा सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आला.
पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण ७.५ कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा यासाठी सीबीआय सर्वोपतरी प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आले होते की नव्हते हे स्पष्ट होईल.