- विराज जगताप खून प्रकरण; रिपाई उभारणार लढा
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
विराज जगताप याचा खून हा जातीयवादातून झाला आहे. भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांनी केली आहे.
पिंपळे सौदागर येथे नुकतीच विराज जगताप या तरुणाची हत्या करण्यात आली होती. विराजच्या कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी दिपक निकाळजे यांनी आज जगताप कुटूंबियांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, रिपाईच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार, पुणे जिल्हाध्यक्ष अमित वर्मा यांच्यासह विविध पदाधिकारी व रिपाईच्या कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगताप कुटूंबियांची भेट घेतल्यानंतर निकाळजे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विराजचा खून करणार्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, राज्यात अनेक ठिकाणी जातीयवादातून खूनाचे प्रकार घडत आहेत. जगताप याचा खूनही जातीयवादातूनच घडला आहे. त्यांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जोपर्यंत यातील आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्हीही स्वस्थ बसणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी राज्य शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी आमची मागणी आहे.
रिपाईच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था पाळून आपल्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत तसेच प्रशासनासमोर मांडाव्यात. प्रत्येक जिल्हाधिकार्यांना व त्या -त्या ठिकाणच्या पोलीस अधिकार्यांना निवेदने देणार आहेत. दलित संरक्षणासाठी रिपाईच्या माध्यमातून लढा उभारला जाईल तसेच जगताप कुटूंबियांच्या पाठिशी सर्व प्रकारची ताकद रिपाईच्या माध्यमातून उभी केली जाईल, असेही निकाळजे यावेळी म्हणाले.
…तर कायदा हातात घेऊ
विराजच्या कुटूंबियांना न्याय देण्यास उशीर केल्यास अथवा राज्यात पुन्हा अशी घटना घडल्यास आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. दलितांच्या संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. राज्यकर्ते आणि पोलिसांनी दलितांवर होणारे अन्याय रोखावेत अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही दिपक निकाळजे यांनी यावेळी दिला.
पिंपळे सौदागर – येथील विराज जगताप याच्या कुटूंबियांची शनिवारी भेट घेऊन रिपाईचे दिपक निकाळजे, शेखर ओव्हाळ, अमित मेश्राम यांच्यासह पदाधिकार्यांनी सांत्वन केले.