पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्या वतीने यावर्षीचा गुरुगौरव पुरस्कार गजानन मेहेंदळे, कार्यकर्ता कृतज्ञता पुरस्कार वाचस्पती स्वर्णलता भिशीकर तर समाजशिक्षक पुरस्कार ह.भ.प. घुले महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच धन्य माता पुरस्कार सुमन त्रिंबक जोशी, अध्यापकोत्तम पुरस्कार अनुजाताई भंडारी यांना जाहीर झाला आहे.
मातृमंदिर विश्वस्त संस्थेद्वारा दरवर्षी विविध पुरस्कार दिले जातात. विविध अभिनव शैक्षणिक स्पर्धा, चिंतन परिषदा, आणि अनेक सामाजिक प्रकल्पांना सहाय्य असे संस्थेचे काम २८ वर्षांहून अधिक काळ चालू आहे. प्रामुख्याने ही संस्था शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून शिक्षण, अध्यात्म या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारच्या पुरस्कार समारंभाचे आयोजन केले जाते. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांमध्ये ‘गुरु गौरव पुरस्कार’,’कार्यकर्ता कृतज्ञता पुरस्कार’, ‘समाजशिक्षक पुरस्कार’, ‘अध्यापकोत्तम पुरस्कार’ असे आणि याशिवायही अन्य काही पुरस्कार दिले जातात.
गजानन मेहेंदळे यांचे इतिहास संशोधन क्षेत्रातील काम सर्वांना मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारे आहे. व्याख्याने, लेखन अशा प्रकारच्या माध्यमातून समाजाचे विचार प्रबोधन करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम त्यांनी अविरतपणे केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल संस्थेस कृतज्ञता वाटते. म्हणूनच यावर्षीचा ‘गुरु गौरव पुरस्कार’ गजानन मेहेंदळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
संस्थेचे अध्यक्ष नितीन कारिया यांनी ज्ञान प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानस व्यक्त केला. यावर्षी त्यांनी पुरस्कृत केलेला कार्यकर्ता कृतज्ञता पुरस्कार ज्ञान प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या वाचस्पती स्वर्णलताताई भिशीकर यांना देण्यात येणार आहे. त्यांनी आजन्म व्रतस्थपणे ज्ञान प्रबोधिनीचे विविधांगी काम उभे केले आहे. त्यांच्या कामातून सोलापूर, हराळी या प्रबोधिनीच्या केंद्रांवर कार्यकर्तृत्वाचे नंदनवन फुलले आहे. त्यांच्या या कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रवचने, व्याख्याने आणि गुरुकुल अशा प्रकारच्या माध्यमातून समाजाचे विचार प्रबोधन करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम हभप घुले महाराज करीत आहेत. त्यांनी निर्माण केलेले गाथा मंदिर समाजाला अभिमानास्पद आणि प्रेरक आहे. त्यामुळे यावर्षीचा ‘समाजशिक्षक पुरस्कार’ हभप घुले महाराज यांना प्रदान करण्यात येईल. ५१ हजार रुपये सहस्त्र, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल. ज्ञान प्रबोधिनी डोंबिवली केंद्राच्या भूतपूर्व केंद्रप्रमुख आणि सध्या सोलापूर जवळील हराळी या ग्रामीण भागात पूरक शिक्षणाचे काम करणाऱ्या श्रुती सुहास फाटक या संपूर्ण कुटुंबासह सामाजिक कामात झोकून देऊन काम करीत आहेत. त्यांच्या मातोश्री सुमन त्रिंबक जोशी यांना यावर्षीचा ‘धन्य राधामाता पुरस्कार’ प्रदान करण्याचे ठरविले आहे. संगणक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसन करण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्रातील संगणक विभागाचे नेतृत्व अनुजाताई भंडारी करीत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये रमून जाऊन त्यांच्यासाठी धडपडणाऱ्या अनुजाताई भंडारी यांना यावर्षीचा ‘अध्यापाकोत्तम पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थेचे कार्यवाह यशवंत लिमये, सहकार्यवाह आदित्य शिंदे यांनी सांगितले. तसेच हा पुरस्काराचा कार्यक्रम आंतरजालाच्या (इंटरनेटच्या) माध्यमातून होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.