पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मागील पंधरा दिवसापासून कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आरोग्यविषयक सुविधा व वैद्यकीय सुविधा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी निर्माण झालेल्या आहेत. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 23) महापालिका भवनासमोर आंदोलन केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील 10 कोरोनाबाधित रुग्ण ऑक्सीजन यंत्रणांमधील तांत्रिक त्रुटीमुळे मृत्यू पावले. या संदर्भात महापालिकेने सर्व यंत्रणा अद्यावत कराव्यात. शहरांमध्ये ऑक्सीजनयुक्त बेडची संख्या वाढवावी. व्हेंटिलेटर्स अधिक प्रमाणात उपलब्ध करावेत. उपचार व्यवस्थेमध्ये सुधारणा करावी आणि दोषीवर गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटले. शिष्टमंडळातमध्ये नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, युवक अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव गिरीश वाघमारे, कष्टकरी पंचायतचे बाबा कांबळे संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, नकुल भोईर, बहुजन सम्राट सेनेचे संतोष निसर्गंध यांचा समावेश होता. या प्रसंगी आयुक्त हर्डीकर यांनी ऑक्सिजन यंत्रणेमध्ये कुठलाही दोष नव्हता, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर आगामी दहा दिवसांमध्ये 700 नवीन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. यातील 500 बेड हे ऑक्सिजनसह असतील व 200 बेड व्हेंटिलेटर असणारे असतील. येणाऱ्या महिन्यामध्ये म्हाळुंगे-बालेवाडीमध्ये 1,000 बेड असणारे सुसज्ज रुग्णालय उभे करण्याची तयारी महापालिका तातडीने करत असल्याबद्दलची माहिती आयुक्तांनी दिली. त्याचबरोबर सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर्स, नर्सेस व वैद्यकीय कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. नजीकच्या काळात नव्या कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असून, शहरातील रुग्णांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले. आयुक्तांनी सकारात्मक चर्चा केल्यानंतर व सर्व प्रकारच्या वैद्यकीय त्रुटींवर लवकरच उपाय करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर, नियोजित आंदोलन काही काळापुरते स्थगित करण्यात आल्याचे मारुती भापकर आणि मानव कांबळे यांनी जाहीर केले.