मावळ । निर्भीडसत्ता न्यूज
मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील कोथुर्णे येथील ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून हत्या करण्यात आली. निष्पाप जिवाला मारणाऱ्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी यासाठी कामशेत, कडघे, बेडसे, पवनानगरमध्ये गुरूवारी (दि. ४) सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढून शोकसभा घेण्यात आली.
निषेध मोर्चामध्ये असंख्य महिला, नागरिक सहभागी झाले होते. तसेच सर्वपक्षीयांकडून कडक निषेध नोंदविला गेला. आरोपीला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली. तसेच आरोपीच्या आईलाही सहआरोपी करण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी पवनानगर बाजारपेठ बंद ठेवून सर्व नागरिकांनी काळे झेंडे दाखवत चिमुरडीला पंधरा दिवसाच्या आत न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशीच दिली पाहिजे अशा घोषणा देत नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.