पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागातील मालमत्तांची थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी तृतीयपंथीयांवर सोपवण्यात आली आहे. यासाठी तृतीय पंथीयांच्या बचतगटाला हे काम देण्यात आले आहे. त्याला महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.
तृतीयपंथीय लोकांना अनेक वर्षांच्या संघर्षांनंतर कायदेशीर मान्यता मिळाली आहे. मात्र आजही हा समाज भारतीय समाजाच्या मुख्य प्रवाहाबाहेर आहे. तसेच आपले हक्क व समाज मान्यतेसाठी लढत आहे. या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रयत्न करत आहे. त्यासाठी तृतीयपंथीयांना महापालिकेचे सुरक्षा रक्षक, उद्यान रखवालदार, ग्रीन मार्शलमधील पदांवर कंत्राटी पद्धतीने काम दिले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने तृतीयपंथीयांना कर संकलन विभागातील विविध कामासाठी घेण्यात येणार आहे.
कर आकारणी व कर संकलन विभागाच्या मालमत्तांची कर वसुली तसेच थकबाकी वसूल करून ती करसंकलन विभागाच्या कार्यालयात जमा करायची आहे. त्यासाठी समाज विकास विभागाकडे नोंद असलेल्या तृतीयपंथीयांच्या बचतगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना एक कोटी रुपये थकबाकी वसूल केल्यास त्या रक्कमेवर एक टक्का प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. तर १ कोटी ते ५ कोटी पर्यंत रक्कमेवर ०.७५ टक्के व ५ कोटी पुढील रक्कमेवर ०. ५० टक्के प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे. त्यास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली.