पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली आहे. 28 जुलै 2017 रोजीचा पदोन्नती समितीचा निर्णय आणि 20 मार्च 2018 रोजीच्या महासभेच्या प्रस्तावानुसार डॉ. साळवे यांनी बढती दिली आहे. याबाबत आदेश प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी काढले आहेत.
आरोग्य वैद्यकी अधिकारी हे रिक्त पद भरण्यासाठी 28 जुलै 2017 रोजी पदोन्नती समितीची सभा आयोजित केली होती. डॉ. अय्यर राजशेखर सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉ. साळवे हे पदोन्नतीकरीता आवश्यक असणारी अर्हता धारण केलेले एकमेव वैद्यकीय अधिकारी होते. डॉ. अनिल रॉय हे डीपीएच ही शैक्षणिक अर्हता धारण करत नव्हते. त्यामुळे डॉ. साळवे यांचा आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावरील पदोन्नतीचा विचार करणे आवश्यक होते. विधी समितीमार्फत महापालिका सभेसमोर प्रस्ताव सादर करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार महासभेने 20 मार्च 2018 रोजी डॉ. साळवे यांना पदोन्नती देण्यास मान्यता दिली होती.
या पदावर नियुक्ती करण्यासाठी हरकत वाटत नसल्याचा अभिप्राय कायदा सल्लागारांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी दिला आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी 23 सप्टेंबर 2022 रोजी पदोन्नती समितीची सभा झाली. कायदा सल्लागार यांचा अभिप्राय, 28 जुलै रोजीचा पदोन्नती समितीचा निर्णय, महापालिका सर्वसाधारण सभेचा 20 मार्च 2018 च्या ठरावाची अंमलबजावणी करणे संयुक्तीक होईल. न्यायालयीन निर्णय, शासन मान्यतेच्या अधिन राहून डॉ. साळवे यांना वैद्यकीय अधिकारी पदावर पदोन्नती देण्याची शिफारस पदोन्नती समितीने केली.