पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येत आहेत. त्यासाठी महापालिका अग्निशमन विभाग तब्बल 113 कोटी रूपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 18 अग्निशमन बंब व वाहने खरेदी करत आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
नियमाप्रमाणे लोकसंख्येनुसार शहरामध्ये 18 अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात केवळ 8 केंद्र आहेत. महापालिकेचा अग्निशमन विभाग हा अत्यावश्यक सेवेचा व अत्यंत संवेदनक्षम विभाग आहे. शहरातील नागरिकांची जीवित व वित्त हानी वाचविण्याचे काम अग्निशमन विभागामार्फत केले जाते.
नवीन अग्निशमन केंद्रासाठी व शासनाकडून नव्याने एकत्रित विकास नियंत्रण नियमावली 2020 मध्ये इमारतीची उंची अमर्यादित केली आहे. यामुळे शहरात 40 मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारती उभ्या राहणार आहेत. या उंच इमारतीची संख्या विचारात घेता व अशा इमारतीमधील आगीसारखे प्रकार घडल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन विभागाकडे अद्यावत अग्निशमन बंब व वाहन उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणातील औद्योगिक कंपन्या वस्त्यांमधील अतिज्वलनशील तरल, द्रव पदार्थ आदींची आग विझविण्यासाठी अद्यावत बंब व वाहनांची आवश्यकता आहे. शहरात काही भांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरत असल्याने, पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी विविध बोटींची, वाहनांची आवश्यकता आहे. या वाहनांची खरेदी करण्यात येत असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी येणार्या 133 कोटी खर्चाच्या अग्निशमन विभागाच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता आयुक्त सिंह यांनी दिली आहे.