पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
राज्य शासनाकडून महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे विविध आजारांवर उपचार करण्यात येतात. मात्र या योजनेचा फायदा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांत मिळत नाही. महापालिकेच्या आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी या रुग्णालयांमध्ये योजना राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र, वर्षभरानंतरही त्याला मंजुरी मिळालेली नाही.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना लागू आहे. या योजनेमध्ये आरोग्य संरक्षण प्रतिकुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपयांपर्यंत देण्यात आले आहे. मंत्रिमंडळाच्या २८ जून रोजी झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. याचा लाभ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि थेरगाव या दोनच रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना मिळत आहे.
आकुर्डी, जिजामाता आणि भोसरी या तीन रुग्णालयांत याचा लाभ मिळत नाही. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवला आहे. मात्र, वर्ष होऊनही राज्य शासनाच्या संबंधित विभागाने अद्याप या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. त्यामुळे या तीन रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
1,356 आजारांवरील उपचार मोफत
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत १३५६ आजारांवरील उपचार समाविष्ट करण्यात आले आहेत. ११९ उपचार केवळ शासकीय रुग्णालयांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी उपचार खर्च मर्यादा प्रतिरुग्ण अडीच लाखांवरून साडेचार लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयांमध्ये स्त्रीरोग आणि बालरोग विभाग पूर्ण क्षमतेने सुरू आहे. पुढील दोन महिन्यात इतर विभाग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर नागरिकांना भुर्दंड बसेल. मात्र, त्यापूर्वी योजना सुरू करण्याचा मानस आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी