पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
घर व परिसरामध्ये साफसफाई न ठेवल्याने परिसरामध्ये डासांची पैदास होते. शहरातील अशा घरांची तपासणी करण्यात आली असून तब्बल ३ हजार ८८४ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. अशा घरमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, साडेसात लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यातील १७ दिवसांमध्ये २८ जणांचा डेंग्यू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जुलैमध्ये ३६ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. डेंग्यूचा प्रसार झपाट्याने होत असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने डेंग्यू डासांची पैदास होणारी ठिकाणे तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये घर, परिसर, जुनी व नवीन बांधकामे तसेच पंक्चर व टायरची दुकाने तपासण्यात येत आहे.
पथकाच्या वतीने २ लाख १९ हजार ६२८ घरांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तब्बल ३ हजार ८८४ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. टायर व पंक्चरच्या ८७४ दुकानांमध्येही डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. शहरामध्ये अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. याठिकाणी पाणी साचत असल्याने साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्यांची पैदास झपाट्याने होते. पथकाच्यावतीने अशा बांधकामांचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार ५२ बांधकामांच्या ठिकाणी अळ्या आढळून आल्या.
अशा ठिकाणच्या मालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशा मालकांची संख्या १६६ असून त्यांच्याकडून ७ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ज्या नागरिकांनी परिसरात स्वच्छता ठेवलेली नाही अशा १ हजार ७३ मालकांना नोटीस देण्यात आली आहे.