पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात हवामान अनुकूल होण्यासाठी उपाययोजना राबवण्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. शहराचे हवामान चांगले आहे. त्यामुळे हवामान स्मार्ट सिटी मूल्यांकन आराखडा 2.0 अंतर्गत हवामान अनुकूलनासाठी काम करत असल्याने महापालिकेला पाचपैकी चार स्टार मानांकन देण्यात आले आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर यांच्या वतीने ‘स्टेट ऑफ सिटीज-टुवर्डस लो कार्बन अॅण्ड रेसिलियंट पाथवेज’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यत पिंपरी-चिंचवड, नागपूर व ठाणे या महापालिकांची कामगिरी विचारात घेण्यात आली आहे.
हरितगृह (ग्रीन हाऊस) वायू कमी करणे, हवामान अनुकूलनासाठी भविष्यातील आव्हाने आणि त्यासाठीच्या उपाययोजनांसाठीची माहिती या अहवाल देण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वाहन उद्योग, औषध निर्मिती, जैवतंत्रज्ञान उद्योगांचा समवोश असलेल्या औद्योगिक क्षेत्रांनी हवामान लवचिकता कृती आराखडा प्रभावीपणे तयार करणे. हवामान लवचिकता उद्धिष्ट निश्चित करण्यासाठी अहवालात कृती बिंदू निश्चित करण्यात आले आहेत.
या संदर्भात महापालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, जलव्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन, शहरी जैवविविधता, मोशी कचरा डेपोत कचर्यातून वीज निर्मिती, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची निर्मिती, इमारतीच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प, हरित इमारती आदींसाठी महापालिका काम करत आहे. या बाबी लक्षात घेऊन महापालिकेस पाचपैकी चार स्टार देण्यात आले आहेत.