पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
विविध सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांद्वारे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 41 वा वर्धापन दिन बुधवारी (दि.11) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच, अधिकारी व कर्मचार्यांनी रक्तदान करून, सामाजिक कार्यात हातभार लावला.
महापालिका भवनाच्या आवारातील पिंपरी-चिंचवड शहराचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, सातारा येथील सनदी अधिकारी एस. झेनिथ, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, उपायुक्त, सहायक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उद्यान विभागाच्या वतीने महापालिका भवनाच्या तळमजल्यावर फुलझाडाच्या कुंड्याचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन आयुक्त सिंह यांच्या हस्ते झाले. रक्तदात्यांना आयुक्तांनी प्रमाणपत्र दिली. अधिकारी व कर्मचारी अशी रस्सीखेच स्पर्धा झाली. त्यानंतर संगीत खुर्ची स्पर्धा झाली. स्पर्धेत महिला व पुरुष अधिकारी, कर्मचार्यांनी सहभाग नोंदवला. महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला. त्यात आयुक्त सिंह यांच्या सह इतर अधिकार्यांनी नाचण्याचा आनंद लुटला. तसेच, पाककला, वेशभूषा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. बक्षीस वितरण चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. तसेच, गुणवंत कर्मचार्यांचा स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.