पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पुनावळे येथे नवीन कचरा डेपो तयार करण्यात येत आहे. त्यासंदर्भात नागपूर येथे होणार्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे हा नियोजित प्रकल्पाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
वन विभागाच्या 23 हेक्टर जागेत महापालिका नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत कचरा डेपो बांधणार आहे. त्यासाठी चंद्रपूर येथील जागा खरेदी करून वन विभागास महापालिकेने दिली आहे. त्याबाबची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मात्र, पुनावळे परिसरातील रहिवाशी आणि हाऊसिंग सोसायटीच्या सदस्यांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. भर वस्तीमध्ये कचरा डेपो निर्माण केल्याने दुर्गंधी निर्माण होईल, असे त्याचे मत आहे. डेपोला विरोध करीत तो इतर ठिकाणी उभारण्याची मागणी ते करीत आहेत. या संदर्भात आंदोलनही करण्यात आले.
हा मुद्दा सध्या गाजत आहे. या प्रकल्पाबाबत हिवाळी अधिवेशनात भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे महापालिकेच्या आयुक्तांकडून मागविण्यात आली आहेत.