पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
दिल्लीच्या सरकारी शाळेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांचा विकास केला जात आहे. त्यासह निगडी ज्ञान प्रबोधिनी विद्यालय आणि खेड तालुक्यातील सह्यादी स्कूलप्रमाणे विविध उपक्रमशील कार्यक्रम राबविले जात आहेत. त्यासाठी शिक्षकांची कोअर टीम केली आहे. त्या माध्यमातून शाळेसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर काम केले जाणार आहे. त्या अंतर्गत जानेवारी महिन्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथे जल्लोष शिक्षणाचा 2024 कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.
या कोअर टीमने नुकताच दिल्ली शहराचा दौरा केला. तसेच, ज्ञान प्रबोधिनी आणि सह्यादी स्कूलची पाहणी केली. याबाबत माहिती देताना ते बोलत होते. जांभळे म्हणाले की, शिक्षण व्यवस्थेमध्ये येणार्या विविध अडचणींवर या समूहाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विभागातील शिक्षकांची कोअर टीम करण्यात आली आहे. ते शिक्षक आपल्या येथे येणार्या अडचणींचा अभ्यास करत आहेत. तसेच यासाठी त्यांना पाच-पाच शाळा विभागून देण्यात आल्या आहेत.
घरात आवश्यक असलेली कामे जसे की नळ दुरुस्ती, फर्निचर बनविणे, इलेक्ट्रिकच्या वस्तू दुरूस्त करणे, बाजारपेठेतील खरेदी-विक्री, रंगकाम, कलाकृती करणे, कुंड्यात रोपे तयार करणे, सजावट अशी कामे कौशल्यवर्धक विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत दर शनिवारी दप्तरमुक्त शाळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.