पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकातील लुप (रॅम्प) तब्बल दहा वर्षांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत.
जागतिक बँकेचे कर्ज घेऊन महापालिकेने चौकात उद्योजक जेआरडी टाटा दुमजली उड्डाण पुल बांधला आहे. कासारवाडीहून चढण्यासाठी पिंपरीच्या दिशेने उतरण्यासाठी रॅम्प आणि पिंपळे गुरव-भोसरी पुलावरून चौकात उतरण्यासाठी लुप बांधला आहे. लुपसाठी सुमारे 10 कोटीचा खर्च झाला आहे. वाहने थेट चौकात उतरणार असल्याने अपघात होण्याचा धोका असल्याने वाहतुक पोलिसांनी हा लुप वाहतुकीस खुला करण्यास परवानगी दिली नाही. गेली 10 वर्षे हा लुप बंद स्थितीत आहे. तर, लुप चुकीचा पद्धतीने बांधल्याने तो खुला केला जात नसल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. तर, महामेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर लुप सुरू करण्याची ग्वाही महापालिका आयुक्तांनी दिली होती.
मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने लुप वाहतुकीस खुला केला जाणार आहे. त्यामुळे पुलावरून खाली चौकात येऊन पुण्याच्या दिशेने जाणार्या वाहनांचालकांची सोय होणार आहे. मात्र, चौकात येथे दुभाजक लावून चौक सिग्नल फ्री करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व बाजूच्या वाहनचालकांना येथे सिग्नलला थांबावे लागणार आहे.