पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
धोकादायक व घातक साहित्य,माल व पदार्थांमुळे अपघात होतात. अशा घातक मालाचा वापर व साठा करणार्या पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक क्षेत्रातील उद्योग व व्यवसायांची तात्काळ माहिती जमा करा. त्या भागांत सीसीटीव्ही यंत्रणा बसवा, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकार्यांना दिल्या.
तळवडे येथील कारखान्यात आग लागून 8 महिलांचा मृत्यू झाला. त्या ठिकाणाची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी आमदार उमा खापरे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, उपायुक्त मनोज लोणकर, क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी ढगे, उपअग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, औद्योगिक सुरक्षा संचलनालयचे संचालक देवीदास गोरे, अखिल घोगरे, योगेश पतंगे, तहसीलदार अर्चना निकम, पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, माजी नगरसेवक पंकज भालेकर, शांताराम भालेकर, केशव घोळवे आदी उपस्थित होते.
गोर्हे म्हणाल्या की, कामगारांची सुरक्षा हा महत्त्वाचा प्रश्न असून औद्योगिक क्षेत्रात काम करणार्या सर्व कामगारांसाठी सुरक्षात्मक उपाययोजना असणे गरजेचे आहे. महापालिकेतर्फे अग्नि सुरक्षा सर्वेक्षण सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. धोकादायक परिस्थितीमध्ये तसेच, स्फोटकांचा वापर करणार्या उद्योगांची माहिती संकलित करण्याचे काम तातडीने पुर्ण करावे. सुरक्षात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी औद्योगिक आस्थापनांना निर्देश द्यावेत.