पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन 11 ते 15 जानेवारी असे 5 दिवस करण्यात आले आहे. त्यासाठी मंगळवार (दि.2) पर्यंत एकूण 750 महिला बचत गटांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जाची सोडत सोमवारी (दि.8) काढण्यात येणार असून, तत्काळ स्टॉलचे वितरण केले जाणार आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू व साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून महापालिकेच्या वतीने दरवर्षी पवनाथडी जत्रा भरवली जाते. त्याला पिंपरी-चिंचवडसह पुणे शहरातून मोठा प्रतिसाद मिळतो. तेथील वस्तू व साहित्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते.
जत्रेत शहरातील महिला बचत गटांचे तब्बल 400 स्टॉल असणार आहेत. त्यात बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, साहित्य, कपडे आदींसह खाद्यपदार्थाचे स्टॉल असणार आहेत. स्टॉलसाठी महा बचत गटांकडून मंगळवारपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. समाज विकास विभागाकडे नोंदणी असलेल्या 750 महिला बचत गटांनी विभागाकडे अर्ज केले आहेत. त्या सर्व अर्जाची दोन ते तीन दिवस छाननी केली जाणार आहे. त्यातील पात्र अर्जांची सोडत येत्या सोमवारी काढली जाणार आहे. त्यानुसार महिला बचत गटांना स्टॉलचे वितरण केले जाणार आहे. एका स्टॉलचे दोन भाग केले जाणार आहेत.