पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
रावेत येथील क्रिएटिव्ह अॅकॅडमीचे प्रमुख नौशाद शेख याच्या विरोधात एका विद्यार्थिनीने लैगिंक शोषण व अत्याचाराची पोलिसांत तक्रार केली आहे. यापूर्वी 2014 ला एका विद्यार्थिसीसोबत असा प्रकार घडला होता. या लैगिंक शोषण प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी. त्या अॅकॅडमीवर कायमची बंदी घालावी. अशा प्रकाराच्या शहरातील इतर संस्थांचा शोध घेऊन तपासणी मोहिम राबवावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर सकल हिंदू समाज या संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे. मोरवाडी येथील हॉटेलमध्ये झालेल्या या परिषदेला भाजपचे आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच, संघटनेचे नितिन वाटकर, धनंजय गावडे, कुणाल साठे आदी उपस्थित होते.
या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू आहे. त्यात धक्कादायक माहिती समोर येत आहे. किमान 13 ते 14 विद्यार्थिनीचे शोषण झाल्याची बाब पुढे उघड झाली आहे. गेल्या दहा वर्षांत अनेक मुलींचे शोषण झाल्याची शंका पदाधिकार्यांनी उपस्थित केली आहे. त्या मुलींना फितवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते का, त्या मुलींना वेश्या व्यवसायासाठी वापरले जात होतो का, अश्लिल चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेलिंग केले जात होते का, असे मुद्दे पदाधिकार्यांनी उपस्थित केले आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी नौशाद शेख याच्यावर कठोर कारवाई केली जावी. संबंधित संस्था कायमची बंद करण्यात यावी. शहरातील या प्रकाराच्या इतर संस्थांचा शोध घेऊन पोलिसांनी तपासणी मोहिम हाती घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.