पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
शहरातील खासगी रूग्णालया व दवाखान्यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासंदर्भात कायदा व नियमांची माहिती देण्यासाठी शहरातील खासगी रूग्णालय व दवाखान्यांतील डॉक्टर व अधिकार्यांची कार्यशाळा आकुर्डी येथील ग. दी. माडगुळकर नाट्यगृहात घेण्यात आली. तसेच, खासगी डॉक्टरांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यात आला.
या कार्यशाळेत खासगी व महापालिका रूग्णालय व दवाखाने, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ, पास्को संस्था आदींचे अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत महापालिकेकडे 617 रुग्णालय व 1 हजार 456 दवाखान्यांची नोंदणी झाली आहे.
कार्यशाळेस महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे, डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे-वालावलकर, डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. संगीता तिरुमणी, डॉ. तृप्ती सागळे, डॉ. शैलजा भावसार, डॉ. ऋतुजा लोखंडे, डॉ. शिवाजी ढगे, वैद्यकीय अधिकारी, डॉ.विजया आंबेडकर, डॉ. अभिजित सांगडे, डॉ. श्रीकांत सुपेकर, डॉ. कल्पना गडलिंकर व महापालिकेचे व खासगी रूग्णालयाचे डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय आयएमए संघटनेचे सहसचिव डॉ. मंगेश पाटे यांनी रुग्णालय नोंदणी, फायर व विद्युत ऑडीट यामध्ये येणार्या अडचणीबद्दल माहिती दिली. उपप्रादेशिक अधिकारी मंचक जाधव यांनी रुग्णालय नोंदणीबाबत, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे यांनी अग्निशमन परिक्षणाबाबत, विद्युत अभियंता अतुल काकड यांनी विद्युत परिक्षणाबाबत, शहर अभियंता मकरंद निकम यांनी बांधकाम परवानगीबाबत आणि ड्रिम डिजायनर अनिकेत बुटाळा यांनी रुग्णालयाची अंतर्गत सजावट करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी रुग्णालय नोंदणीत सुसुत्रता आणण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. अभयचंद्र दादेवार यांनी स्वागत केले. डॉ.वर्षा डांगे-वालावलकर यांनी आभार मानले.