निर्भीड न्यूज –
सहकारी बँका या सभासद, कर्जदार, ठेवीदार व संचालक मंडळ यांच्यातील एकमेकांच्या विश्वासावर प्रगती करत असतात. बँकेला उत्पन्न मिळवून देणारा कर्जदार घटक जेवढा महत्वाचा असतो तेवढाच संचालक मंडळाच्या विश्वासावर आपली आयुष्याची कमाई ठेव स्वरुपात ठेवणारा ठेवीदार देखील महत्वाचा आहे. केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या कडक कायद्यांमुळे सहकारात अनेक अडचणी उभ्या राहणार आहेत. यावर मात करून सभासदांचे हित जोपासत संस्था नफ्यात चालविणे हे संचालक मंडळाचे ध्येय असावे, असे मार्गदर्शन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या वतीने नवी पेठेतील एमएस जोशी सभागृहात नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्ह्यातील प्रगतीशिल बँकांचा विविध पुरस्कार देऊन अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी माजी आमदार अनिल भोसले, राजर्षी शाहू सहकारी बँकचे अध्यक्ष आबासाहेब शिंदे, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश ढेरे, उपाध्यक्ष सुनील रुकारी, मानद सचिव ॲड. सुभाष मोहिते आदी उपस्थित होते.
या वेळी प्रेरणा को. ऑप. बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर यांचा ‘शून्य टक्के NPA आणि प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त सहभाग’ असे दोन पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रेरणा को. ऑप. बँक सलग तीन वर्ष शून्य टक्के NPA हा पुरस्कार मिळवित आहे. या वेळी संचालक श्रीधर वाल्हेकर, अंकुश प-हाड, नंदकिशोर तोष्णीवाल, सुजाता पारखी, मीना शेळके व कार्यकारी संचालक तानाजी सोनवणे आदींनी पुरस्कार स्वीकारला.
तुकाराम गुजर यांनी 1998 साली 1600 सभासदांसह 29 लाख रुपये भागभांडवलावर स्थापन केलेल्या प्रेरणा बँकेने 245 कोटी रुपये ठेवी व 145 कोटी रुपये कर्जवाटप केले असून बँकेला सतत ऑडीट वर्ग “अ” मिळत आहे. बँक सीबीएस संगणक प्रणालीद्वारे एटीएम, आधारकार्ड संलग्न सेवा, सरकारी करांचा भरणा, RTGS, NEFT, पॅनकार्ड व लॅाकर्स सुविधा इ. आदी सेवा बँकेत दिल्या जातात. बँकेच्या पुणे जिल्ह्यात एकूण दहा शाखा आहेत. ग्राहक उपयोगी सेवा तत्परतेने देण्यासाठी कुशल कर्मचारी वर्ग सक्षम ठेवला आहे.