निर्भीडसत्ता न्यूज –
भारताचे १४ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी १७ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झाले आहेत. आज सकाळपासून ही मतमोजणी संसद भवनात सुरू होती. यामध्ये कोविंद यांना ६५.३५ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली.
या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदान केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा कोविंद यांना भेटण्यासाठी १० अकबर रोड येथील त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.
नवे रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तरप्रदेशातील कानपूरमधील पराऊंख गावात १ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. रामनाथ कोविंद कोळी जातीचे असून पेशाने वकील आहेत. कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालयात काम केले आहे. रामनाथ कोविंद १९७७ ते १९७९ या कालावधीत दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे वकील म्हणून कार्यरत होते. रामनाथ कोविंद यांना १९९४ मध्ये भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली.
रामनाथ कोविंद भाजपकडून दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. पक्षाचा दलित चेहरा म्हणून रामनाथ कोविंद यांना ओळखले जाते. ८ ऑगस्ट २०१५ रोजी कोविंद यांची बिहारच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद रामनाथ कोविंद यांच्याकडे होते.