निर्भीडसत्ता न्यूज –
आकर्षक सजावट केलेले विविध रंगी रथ, बॅण्ड, ढोल-ताशा पथकांचा दणदणाट, मंडळांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत भोसरीकरांकडून सोमवारी (दि. ४) सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
भोसरीतील सार्वजनिक गणेश मंडळांनी सालाबादप्रमाणे यंदाही अनंत चतुर्दशीच्या आधी एक दिवश भावपुर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. गणेश मंडळाच्या स्वागतासाठी महापालिकेतर्फे पीएमटी चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. गणेश मंडळांच्या आगमनानंतर मंडळांच्या अध्यक्षांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भोसरी गावठाणातून दुपारी ठीक २ वाजून ४५ मिनिटांनी सर्वप्रथम खंडोबा मितत्र मंडळाच्या गणरायाच्या आगमनाने मिरवणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर संत ज्ञानेश्वर भाजी मंडई, समस्त गव्हाणे मंडळ, आझाद मंडळाच्या गणरायाचे विसर्जन झाले.
त्यापाठोपाठ कानीफनाथ मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, श्री गणेश मंडळ, श्री शिवाजी मित्र मंडळ, टांगा पलटी घोडे फरार, श्री छत्रपती शिवाजी मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन झाले. लांडगे ब्रदर्स फ्रेंन्ड सर्कलच्या आकर्षक रथात श्री गणेशा विराजमान झाले होते. फुगे माने तालीम मंडळाने रथावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली होती. लांडगे लिबाची तालीम मंडळ, श्रीराम मंडळ, समस्त मधले फुगे मंडळ, भोजेश्वर मित्र मंडळ, नवहाराष्ट्र मंडळाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मिरवणूक काढली होती. अशा अनके मंडळांच्या गणरायाचे भोसरीत विसर्जन झाले.
भोसरीतील विहीरीमध्ये, मोशीतील व आळंदीमधील इंद्रायणी नदीत मंडळानी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. भोसरी तळ्याजवळील विहरीजवळ सुक्षितेच्या दृष्टीने महापालिकेचे जीवरक्षक अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी मोठा फौजफाटा सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आला होता. स्पेशल फोर्सबरोबर विशेष वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.