निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लिनिअर अर्बन गार्डनच्या कामाची राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी मंगळवार (दि. १२) पाहणी केली. त्यांनी कामांमध्ये काही बदल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच उद्यान उभारणीचे काम लवकर पूर्ण करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
पिंपळेसौदागर येथील कोकणे चौक ते हॉटेल स्वराज गार्डनपर्यंत लिनिअर अर्बन गार्डन उभारण्यात येत आहे. या उद्यानाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. त्याच्या कामाची राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी पाहणी केली. त्यांच्यासोबत महापालिकेचे सहशहर अभियंता राजन पाटील, राउत, माळी, वास्तुविशारद चव्हाण आदी उपस्थित होते.
नगरसेवक नाना काटे यांनी उद्यानाच्या कामांमध्ये काही बदल करून त्या अंमलात आणण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. या उद्यानात प्लाझा बनविण्यात येणार आहे. त्याठिकाणी शहाबादी फरशी बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र नगरसेवक काटे यांनी शहाबादी फरशीऐवजी कौटा फरशी बसविण्याची सूचना केली. तसेच कोकणे चौक ते चालेंजर शाळेपर्यत असलेल्या उघड्या नाल्यांमध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरच सुरू करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.