पक्षनेते एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली बैठक; २४ x ७ पाणी पुरवठ्याबाबत शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा
पिंपरी |प्रतिनिधी
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची सद्यस्थिती पाहता भविष्यातील पाण्याची गरज यासाठी पाणी आरक्षण वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल. 30 एमलडी पाणी उचलण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती जलसंपदा मंत्र्यांना करण्यात येणार आहे, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
या संयुक्त बैठकीस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता रविंद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे, विशाल कांबळे, आदी या वेळी उपस्थित होते.
२४ x ७ पाणी पुरवठा योजना, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना होणारा पाणी पुरवठा, बेकायदेशीर नळजोड व पाणीपुरवठा विभागाकडील अडचणी व त्यावरील उपाययोजना या बाबत आज बुधवारी (दि. १५) निगडी येथील सेक्टर २३ मधील महापालिकेच्या कार्यालयात पक्षनेते एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.
पक्षनेते पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबत सद्यस्थितीचा आढावा घेतला. शहराच्या वाढत्या लोकसंख्येसाठी भविष्यात वाढीव पाण्यासाठी, धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचीही विस्तृत माहिती घेतली. तसेच, पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात अनियमित पाणीपुरवठा कसा दूर करता येईल याचा आढावा घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि पदाधिका-यांची बैठक आयोजित करण्यात अली होती. पक्षनेते पवार यांनी कामाची गती वाढविणेबाबत पाणीपुरवठा अधिका-र्यांना सुचना केल्या. पाण्याचा योग्य वापर, पाण्याची गळती कमी करणे याकामी विविध कार्यक्रमांद्वारे नागरीकांमध्ये जागृती करणे बाबत संबंधितांना निर्देश दिले.
सर्व नगरसेवकांसाठी २४ x ७ पाणी पुरवठा योजना काय आहे या योजनेची माहिती होण्यासाठी चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे शुक्रवार (दि.17) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही पक्षनेते पवार यांनी सांगितले.