दिव्यांगांसाठी दहा कोटीची तरतूद
निर्भीडसत्ता न्यूज –
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळी दिव्यांगांसाठी पहिला कायदा करण्यात आला. देशातील पहिली महापालिका दिव्यांगांसाठी दोन हजार रुपये पेन्शन योजना सुरु करणारी पहिली पिंपरी-चिंचवड महापालिका आहे. महापालिकेच्या वीतने अपंग सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याव्दारे शहरातील अंध, अपंग, मतीमंद अशा विशेष व्यक्तींना एकाच ठिकाणी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा पालिकेचा विचार आहे. तसा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. यमुनानगर येथील अपंग विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघमोडे यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पवार बोलत होते.
महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिकेच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुनीता तापकीर, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नामदेव ढाके, अंबादास कांबळे, उत्तम केंदळे, सदाशिव खाडे आदी या वेळी उपस्थित होते.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळी उपसूचनेव्दारे हे अपंग सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्राथमिक १० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली असल्याचे हि पवार यांनी सांगितले. पालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाने नवी मुंबईतील अपंग एज्युकेशन व प्रशिक्षण केंद्राच्या धर्तीवर ही संकल्पना राबविण्याचा विचार केला. त्यानुसार सर्वसाधारण सभेने या विषयाला मंजुरी दिली आहे.
पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाशेजारी क्रोमा सेंटरजवळ महापालिकेचा आरक्षित भुखंड आहे. या भुखंडाचा सध्या खासगी लोकांकडून वाहनतळ म्हणून उपयोग केला जातो. मात्र, पालिकेने सुमारे १८०० चौ. मीटर भुखंडावर हे अपंग केंद्र साकरण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे चार मजली इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी दोन वर्षात सुमारे आठ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद अशा विशेष व्यक्तींसाठी सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यांना लागणारे दाखले, वैद्यकीय तपासण्या, कार्यशाळा, प्रशिक्षणाच्या उद्देशाने हे केंद्र होणार आहे. त्यासाठी अंध, अपंगासाठी काम करणा-या सामाजिक संस्थाचीही मदत घेतली जाणार असल्याचेही सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.