निर्भीड न्यूज –
भ्रष्टाचारापासून दूर राहून आपले काम निष्ठापूर्वक करणे हीच खरी देवपूजा असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक व समाजसेवक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी येथे केले.
आकुर्डी येथील चिरंजीव पीठच्या वतीने आयोजित ज्ञानोत्सवात पं. राजू सवार यांनी संशोधन केलेल्या सोलोपॅथीची विस्तृत माहिती देणाऱ्या ‘सोलोपॅथी – संपूर्ण स्वास्थ्य की कुंज’ या हिन्दी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ संशोधक डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पं. राजू सवार, ज्ञानोत्सव प्रमुख सर्वोत्तम जोशी, राजीव जोगळेकर, पोपटलाल मुनोत, किशोर धूत, रमेश जोशी, नुपुर जोगळेकर, प्रदीप चंद्रात्रे, प्रमोदिनी बावस्कर आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. बावस्कर म्हणाले की, पाश्चात्य देश भौतिक सुखाच्या मागे लागले आहेत. त्यांचे अनुकरण आपल्याकडचे सुशिक्षित करत आहेत. देशासाठी थोडेतरी करा, भ्रष्टाचार करु नका हे कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांना सांगितले पाहिजे.
यावेळी आपले वैद्यकिय क्षेत्रातले अनुभव सांगत असतानाच मनुष्याला आनंदरस प्राप्त करुन देणे हे डॅाक्टरचे काम असल्याचे डॉ. बावस्कर यांनी सांगितले.
पं. राजू सवार म्हणाले की, भावभावनांमध्ये जे रस पाझरतात ते रस निर्माण करण्याची ताकद कोणत्याही औषधात नाही. देव मानला, न मानल्याने फारसा फरक पडत नाही; पण देव जाणला तर निश्चित बदल घडतो, असे ते म्हणाले.
अनिल खैरे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.