निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यामागे उभारण्यात आलेल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचे उद्घाटन पुढील आठ दिवसात करावे. तसेच या स्मारकात पिंपरी चिंचवड मनपा वतीने विविध कार्यालय थाटण्याचा घाट घालण्यात येत आहे. याला आमचा तीव्र विरोध आहे. याबाबत अनेक वेळा मनपा अधिकारी व पदाधिका-यांना प्रत्यक्ष भेटून पत्र दिले आहेत. तरी देखील आयुक्तांच्या आदेशाने याठिकाणी फर्निचर व इतर कामे सुरु असल्याचे प्रत्यक्ष दिसत आहे. याबाबत देखील आणि मा. आयुक्त, मा. महापौर, मा. पक्षनेते यांना भेटून निषेध नोंदविला आहे व तसे पत्र देखील दिले आहे. आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास सावित्रीबाई फुले स्मारक समितीच्या वतीने स्मारकाचे उद्घाटन करण्यात येईल. यानंतर देखील येथे मनपाची कार्यालये थाटल्यास तीव्र आंदोलन करु. असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला. सोमवारी आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेत नगरसेवक संतोष लोंढे, माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे, आनंदा कुदळे, चंद्रकांत डोके, विजय लोखंडे, हनुमंत माळी,ॲड. चंद्रशेखर भुजबळ, ईश्वर कुदळे, संतोष जोगदंड, गुलाब पानपाटील, पी. के. महाजन आदी उपस्थित होते.
तसेच या सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय स्मारकात थोर समाज क्रांतीकारक महात्मा जोतीबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट तैलचित्राव्दारे प्रदर्शित करावा. तसेच फुले दांपत्याने लिहिलेली पुस्तकांच्या समावेश असणारे भव्य अत्याधुनिक ग्रंथालय उभारावे. फुले दांपत्याच्या कार्याची सत्यशोधक समाजाची विस्तृत माहिती देणारे फलक उभारावेत. शहरातील गरीब, गरजू, हुशार विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षांना मार्गदर्शक ठरणारी अभ्यासिका उभारावी. थोर समाज सुधारकांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यासाठी व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी मिटिंग हॉल उपलब्ध करुन द्यावा. तसेच शहरातील लघुउद्योजकांना विशेषता महिला लघु उद्योजकांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारावे. अशी मागणी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.