महिला व बालकल्याण समितीचा निर्णय
निर्भीडसत्ता न्यूज –
अंध, अपंग व्यक्तीच्या विवाहासाठी अनेक अडथळे येतात. मात्र, अंध, अपंग जोडीदाराशी विवाह केल्यास संबधितांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य पालिकेच्या वतीने देण्यात येईल. ही योजना सुरू करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतल्याचे सभापती सुनिता तापकीर यांनी सांगितले.
महिला व बालकल्याण समिती सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती सुनिता तापकीर होत्या. शहरातील दिव्यांग व अपंग व्यक्तीच्या विवाहामध्ये अनेक अडचणी येतात. अशा व्यक्तींनाही चांगला जोडीदार मिळावा. या उद्देशाने पालिकेच्या महिला बालकल्याण समितीने दिव्यांग व अपंग व्यक्तीबरोबर विवाह केल्यास एक लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव समितीने ऐनवेळी मंजूर केला आहे. त्याबाबत नागरवस्ती विकास विभाग सविस्तर योजना तयार करणार आहे.
महापालिका नगरसेवकांनी अहमदाबाद शहराचा दौरा केला. अहमदाबादच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरात किड्स सिटी राबविण्याचा प्रस्ताव तापकीर यांनी ऐनवेळी मांडला. बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामध्ये अग्नीशमन यंत्रणा, रुग्णालय, बँकिंग, पोलीस यंत्रणा, महापालिका, प्रिंट मिडिया, बीआरटी बससेवा, एटीएम सेवा, एनसीसी कॅम्प, रेडिओ स्टेशन, टेलिफोन, थिएटर, हेरिटेज गॅलरी, न्यायलय याची माहिती मुलांना मिळू शकेल. तसेच, पिंपरी-चिंचवड शहरातील मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे व योगा प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी स्मार्ट गर्ल योजना राबविण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतला आहे. महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनींना हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.